१५ जुलैचा ‘बुंडेस्तागच्या बुलंदीचा बोध’ हा लोकसत्तेतला अग्रलेख अप्रतिम होता. जर्मनीच्या आर्थिक-राजकीय बदलांची फुटबॉलमधल्या तिच्या यशाबरोबर
घातलेली सांगड समर्पक आहे. जर्मनीच्या विजयासाठी अजून
एक घटक कारणीभूत आहे, त्याच्याबद्दल लिहावेसे वाटते.
मुळात जर्मन नसलेल्या पण आता जर्मनीत कायमपणे स्थायिक झालेल्या
लोकांची पुढली पिढी जर्मन संघात प्रकर्षाने दिसते. शतकानुशतके जर्मनीचे ज्या
देशाशी हाडवैर होते त्या पोलंडमधे जन्मलेला पोडोलस्की असो, वा जर्मनीतल्या मुख्य
प्रवाहापासून फटकून राहणाऱ्या तुर्की कामगार समाजातून आलेला ओझील, किंवा जर्मन
वंशश्रेष्ठत्वाच्या पारंपरिक कल्पनांना छेद देणारा कृष्णवर्णीय बोएतेंग - जर्मन समाजाने या ‘बाहेरच्यांना’ मोठ्या सामंजस्याने
सामावून घेतलेले दिसते. या बदलांचा आवेग समजून घ्यावयाचा असला तर भारतीय क्रिकेट
संघात एक पाकिस्तानात जन्मलेला, एक नेपाळी गुरख्यांचा मुलगा आणि एक कॅरेबियन वशांचा असे खेळाडू खेळतायेत आणि
आपली जनता त्यांना डोक्यावर घेतेय असे चित्र डोळ्यांपुढे आणावे लागेल.
यामुळे जर्मन फुटबॉलमधल्या क्रांतिकारक बदलांना या वांशिक वैविध्यतेचा फार मोठा हातभार लागला आहे.
अगदी हल्लीहल्लीपर्यंत म्हणजे २००२ पर्यंत ‘कणखर पण कंटाळवाणा संघ‘ अशी प्रतिमा असलेला जर्मन
संघ आता आकर्षक आणि सुंदर खेळासाठी ओळखला जातोय. (१९७०च्या जगज्जेत्या ब्राझील संघातल्या अनेक खेळाडूंनी जर्मनीचा खेळ
पाहून हा संघ आम्हाला आमच्या ‘जोगो बोनितो‘ शैलीची आठवण करून देतो असे
म्हटले आहे). जर्मनीच्या यशस्वी महिला फुटबॉल संघाची आघाडीची खेळाडू फात्मिरे अलुशी ही सुद्धा मुळची
कोसोवीची आहे. ‘या घुसखोरांना बाहेर फेका’, ‘जर्मन भूमिपुत्रांना संघात राखीव जागा ठेवा‘ असे जर्मन नारे
बर्लिनमध्ये दुमदुमले नाही. यावरून स्थलांतरित लोकांना
जर्मन समाजात कसे आघाडीचे स्थान हळूहळू प्राप्त होत आहे हे दिसते.
हा समज दृढ होण्या अनेक अनुभव आम्हाला विश्वचषक स्पर्धेच्या वेळी
आले. अंतिम सामन्याच्या दुपारी आम्ही म्यूनिचच्या ऑलिम्पिक संकुलात होतो. जमलेल्या अफाट गर्दीत आम्हाला हिजब
घातलेल्या तुर्की यौवना दिसल्या. या मुलींनी गळ्यात जर्मन राष्ट्रीय रंगांच्या
फुलांच्या माळा घातल्या होत्या, आणि त्यांच्या तोंडातून ‘डॉईश्लॅन्ड, डॉईश्लॅन्ड‘ (जर्मनी, जर्मनी) असा घोष नारा
अथक चालू होता. गर्दीत घाना आणि नायजेरीअन युवक बरेच दिसत होते. आमच्या परिसरात एक
लोकप्रिय भारतीय हॉटेल चालवणाऱ्या मूळ मुंबईकर असलेल्या एका कुटुंबाने तर प्रत्येक
जर्मन सामन्याच्या वेळी आपले हॉटेल बंद ठेवले होते, कारण त्यांना ‘त्यांच्या‘ जर्मन संघाचा खेळ चुकवायचा
नव्हता.
स्थलांतरित लोकांचे श्रम आणि कौशल्य फक्त वापरून न घेता त्यांना
समाजधारेत सुद्धा सामावून घेण्याचा जर्मन प्रयत्न पाहता अग्रलेखात नमूद
केल्याप्रमाणे जर्मनी आर्थिक-राजकीय महासत्ताच नव्हे तर फुटबॉल महासत्ता पुन्हा होणार आहे यात शंका
नाही.
(प्रथम प्रकाशित: लोकसत्ता जुलै २०१४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा