लोकसत्तेने स्पेनचे नवीन राजा फिलिप सहावे
यांची घेतलेली दखल (लोकसत्ता, २१.०६.२०१४) समयोचित आहे. योगायोगाने गेल्या
आठवड्यात मी माद्रिदमध्ये असल्यामुळे राज्यरोहणाचा समारंभ जवळून बघता आला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आधीचे राजा कार्लोस यांची शेवटची काही वर्षे वादग्रस्त
ठरली होती. त्यामुळे स्वच्छ आणि शालीन प्रतिमा असलेले फिलिप सहावे यांच्या
राज्यरोहणाकडे स्पॅनिश जनता कश्या आतुरतेने वाट बघत होती याचा प्रत्यक्ष प्रत्यय
आला.
‘ग्रान विया’ हा माद्रिदमधल्या मुख्य रस्त्यांपैकी एक.
समारंभाच्या सकाळपासूनच हा महामार्ग गर्दीने फुलून आला होता. उत्साही
माद्रिदकरांच्या या गर्दीत मला सहज मिसळता आले. गर्दीतल्या एकाने माझ्या हातात
स्पेनचा झेंडा दिला. स्पॅनिश संसदेतले आपले अर्थगर्भ आणि आटोपशीर भाषण संपवून फिलिप,
राणी लेतीझिया आणि त्यांच्या दोन मुली जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करायला
मोटारगाडीत बसल्या. त्यांच्या मागे (माझ्या अंदाजानुसार) चाळीस घोडेस्वारांचा ताफा
होता, बाकी सुरक्षा जुजबी होती. असा हा ताफा जेव्हा आमच्या समोरून अगदी जवळून गेला
तेव्हा आमच्या उत्साहाला उधाण आले. ‘फेलिपे,
फेलिपे’ (फिलिप यांचा स्पॅनिशमधला उच्चार) या घोषणांनी ग्रान विया
दुमदुमत होता. हसतमुख चेहऱ्याने आमचे अभिवादन स्वीकारणाऱ्या या उमद्या, तरुण
राजाला वीस फुटांच्या अंतरावरून पाहण्याचा अनुभव कायम लक्षात राहील. (त्याचवेळी
कायम आजूबाजूला कायम सुरक्षारक्षकांचा ताफा बाळगत जनतेपासून आपले तोंड लपवत
फिरणाऱ्या आपल्या तथाकथित लोकप्रतिनिधींची आठवण येऊन थोडेसे वाईटही वाटले.)
स्पेनपुढे अनेक प्रश्न उभे आहेत (आठवड्याभराच्या
भेटीतही जाणवतील असे!). या समस्यांना सामोरे जायला नामधारी का होईना पण योग्य असे
नेतृत्व स्पेनला फिलिप सहावे यांच्या रूपाने लाभले आहे असे वाटते.
(प्रथम प्रकाशित: लोकसत्ता जून २०१४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा